छत्रपती संभाजीनगर (सांजवार्ता ब्युरो) : मामेबहिणीशी बोलत असल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका १९ वर्षीय तरुणावर चाकूने वार करून त्याचा खून करण्यात आल्याची घटना गारखेडा परिसरातील साईनगर येथे बुधवारी (दि. १४) रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली. तौसिफ शमीम शेख (वय १९, रा. साईनगर, गारखेडा परिसर) असे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी आदित्य शेळके रा. साईनगर याच्याविरुद्ध पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.
मयताचे चुलत भाऊ मुजम्मील जमील शेख यांनी फिर्याद दिली. फिर्यादीनुसार, त्यांच्या घराच्या बाजुला तौफिक शेख आईवडिलांसह राहतो. तो सेंट्रिंगचे काम करतो. बुधवारी रात्री १० वाजेच्या सुमारास जेवण झाल्यानंतर ते आणि तौसिफ नूर मस्जिदच्या पाठीमागे बसले होते. त्यावेळी आदित्य शेळके तेथे आला. आदित्यची मामेबहीण तौसिफशी बोलत असल्याच्या कारणावरून त्याने तौसिफसोबत वाद घातला. त्यानंतर फिर्यादींनी तौसिफला घरी जाण्यास सांगितले. तेव्हाच आदित्य याने तुला सोडणार नाही, अशी धमकी दिली. काही वेळाने फिर्यादी त्याच्या घरासमोर आले असता तौसिफ तेथे मोटारसायकलवर बसून मोबाईल पाहत होता. ११ वातेच्या वाजेच्या सुमारास आदित्य तेथे आला. त्याने अचानक हातातील चाकूने तौसिफच्या छातीत वार केला. या घावाने तौसिफ खाली कोसळला. त्यानंतरही आदित्यने त्याच्या चेहर्यावर, डोक्यावर चाकुने वार केले.
आम्ही तौसिफकडे धाव घेतली असता आदित्य शेळके तेथून पळून गेला. घटनेनंतर तौसिफच्या नातेवाइकांनी त्याला तातडीने मोटारसायकलवरून एमजीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथील डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. तौसिफच्या छातीसह नाक आणि डोक्यावरही जखमा असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. मामेबहिणीशी बोलण्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान थेट खुनात झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पुंडलिकनगर ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र मुंडे यांच्यासह पथकाने धाव घेत परिसराची पाहणी केली. आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस शोध घेत आहेत.














